पुणे : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पिंपळवंडी हद्दीतील एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर व त्यांच्या बंधूवर आळेफाटा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापूर्वीही अधिकारी व तलाठी यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांचेवर दखलपात्र गुन्हे दाखल आहेत़ या प्रकरणामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. निवृत्ती तबाजी कुटे (वय ७०) रा़ पिंपरीपेंढार यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दि. ५ जानेवारी २०१७ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार शरद सोनवणे व त्यांचे बंधू शशिकांत सोनवणे (रा. ़पिंपळवंडी) यांच्याविरुद्घ भा. दं. वि. कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ व ४२७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आमदार सोनवणे व त्यांच्या बंधूंनी ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजुरी ते पिंपळवंडी (खोलवाट) या लोकसहभागातून चाललेल्या रस्त्याच्या ठिकाणी कुटे व त्यांची मुले संदीप आणि सचिन यांना बोलावून घेतले़ तुम्ही माजलात का? मी तालुक्याचा आमदार आहे, असे म्हणून कुटे व त्यांच्या मुलांना मारहाण केली.़ मुलाने शूटिंग केल्याने त्याचा मोबाईल घेऊन तो दगडाने ठेचला, अशी तक्रार दाखल केली आहे़ यापूर्वीदेखील आमदार शरद सोनवणे हे अशा विविध प्रकरणांमधून सातत्याने चर्चेत राहिलेले आहेत. त्यांच्याविषयी तक्रारीही दाखल झालेल्या आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये या नव्या प्रकरणाचीही जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तलाठी हरण व जुन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संजय वारूळे यांना मारहाण केल्याप्रकरणी जुन्नर व आळेफाटा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल आहे़ मारहाण प्रकरणी यापूर्वी ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते़ पुन्हा एकदा शेतकऱ्याला मारहाण केल्याबद्दल पुणे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे़ आमदार सोनवणे यांनी यापूर्वी कार्यकर्त्याला उपोषण करीत असल्याबद्दल केलेली दमदाटी, ठेकेदाराने टेंडर भरू नये, म्हणून केलेली दमदाटीचे रेकॉर्डिंगसुद्धा चांगलेच गाजलेले आहे़ (वार्ताहर)
शरद सोनवणेंची शेतकऱ्याला मारहाण
By admin | Published: January 10, 2017 2:53 AM