मुंबई : शेअर खरेदीविक्रीचे बेकायदेशीर व्यवहार करीत कर चुकवून शासनाला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मालाडच्या ओम इन्व्हेस्टमेंट या कंपनीचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. शासनाचा कर चुकवून फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. मालाड पूर्वेकडील पोद्दार रोड परीसरात या कंपनीचे कार्यालय आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.व्ही चव्हाण, मिलिंद देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय देवाडीकर तसेच सायबर आणि सेबीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या ठिकाणी शेअर टे्रडींगचा व्यवसाय सुरु असल्याचे समजले. ओम इन्व्हेस्टमेंट कंपनीचा मालक विनोद शहा पोलिसांच्या हाती लागला. ही कंपनी एंजल ब्रोकींग या शेअर ब्रोकींग कंपनीची सब ब्रोकर कंपनी असल्याचे शहाने पोलिसांना सांगितले. मुळात या ठिकाणी होत असलेले शेअरर्सचे व्यवहार हे कोणत्याही स्टॉक एक्स्चेंजवर न करता ते केवळ कागदोपत्री केले जात असल्याचे समोर आले. त्यात हे सर्व व्यवहार रोखीने होत असल्याने दिवसाला या कंपनीचा टर्नओव्हर ५ कोटींचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार वर्षाला या कंपनीचा टर्नओवर हा २ ते ३ हजार कोटींमध्ये असल्याचे समजले. कर चुकविण्यासाठी या कंपनीने बेकायदेशीर शेअर्सचा व्यवहार केल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालक विनोद शहा याच्यसह अरुण सिंग आणि प्रदीप सिंगला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १६ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)
शेअर व्यवहारात शासनाला कोट्यवधींचा गंडा
By admin | Published: June 13, 2016 2:28 AM