मुंबई : पाकिस्तानला चांगला धडा शिकविणे गरजेचे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणे दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. शरीफ यांच्याबरोबरच्या भेटीत मोदींनी मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविल्याचे कौतुक भाजपाने सुरू केलेले असताना मित्र पक्ष शिवसेनेने मात्र आजच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. ठाकरे म्हणाले की, भारत-पाकिस्तान संबंध अद्याप सुधारलेले नाहीत. सीमेवरील पाकिस्तानच्या कारवाया बघता आपल्या सरकारने धडा घेतला की नाही माहिती नाही, पण पाकिस्तानला चांगला धडा शिकविणे आवश्यक आहे. काश्मीरबाबत पाकिस्तानशी चर्चा कशाला, असा सवाल करून उद्धव म्हणाले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकव्याप्त काश्मीरवरील हक्क केंद्राने कुुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये. चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही. म्यानमारमध्ये जाऊन केली तशी कारवाई केली पाहिजे. पाकिस्तानला उत्तर देण्याची क्षमता पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे आणि भारतीय जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. एसटी महामंडळात ५० आदिवासी युवकांना चालक म्हणून सामावून घेण्यात आले. ‘मातोश्री’वर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय राऊत आदी.युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या नाइट लाइफचे समर्थन केले असतानाच भाजपाने नाइट बाजारचे पिल्लू सोडले आहे. याबाबत विचारले असता उद्धव म्हणाले की, त्यांना ही कल्पना कोणी दिली ते विचारा. युवा सेनेने सर्वप्रथम नाइट लाइफची कल्पना मांडली. कारण मुंबई कधीही झोपत नाही. जे रात्रपाळीत काम करतात त्यांच्यासाठी नाइट लाइफची योजना होती. ती न स्वीकारता रात्रबाजार योजना कशी स्वीकारता येईल, असा सवालही त्यांनी केला.अमित शहांना टोला : भविष्यात एकहाती सत्ता येईल, यासाठी मेहनत करण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना केले होते. याबाबत विचारले असता उद्धव उपरोधिकपणे म्हणाले की, मी ते वर्तमानपत्रात वाचले. त्यांना वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान यांच्यासारखे एकहाती सत्ता आणणारे मुख्यमंत्री हवे आहेत का?(विशेष प्रतिनिधी)
‘शरीफ’ भेट दुदैवी
By admin | Published: July 11, 2015 1:54 AM