Sanjay Raut : १८ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांचा निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने एनडीएचे उमेदवार असलेल्या ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजप खासदार ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी लोकसभेत एकत्र आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींसह हात मिळवला. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.
ओम बिर्ला यांची या पदावर निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या आसनावर नेले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. एका दिवसापूर्वी इंडिया आघाडीने राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारणारे ते गांधी घराण्यातील तिसरे नेते आहेत. त्यांची आजी सोनिया गांधी आणि वडील राजीव गांधी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. यावरुनच संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचा फोटो ट्वीट करत इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कौन राहुल म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. त्यावरुनच आता खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत, "हा हा हाहा, कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?," असं कॅप्शन संजय राऊत यांनी दिलं आहे.
यावेळी आमचीही ताकद जास्त - राहुल गांधी
"सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्या आवाजाचे अंतिम पंच आहात. सरकारकडे राजकीय ताकद आहे, पण विरोधकांकडेही भारताचा आवाज आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी विरोधकांची ताकद जास्त आहे," असे राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना म्हटलं होतं.