- नरेश डोंगरे, नागपूर
कोर्टाच्या परिसरात भर दिवसा अश्विन नाईकवर गोळी झाडणारा शार्प शूटर रवी ऊर्फ रवींद्र शांताराम सावंत अखेरच्या दिवसात कमालीचा दयनीय जीवन जगला. ज्याच्या गळ्यातील कधीकाळी रवी सावंत ताईत होता, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हा सावंतच्या अखेरच्या दिवसात आसपासच (कारागृहात) होता. दिवसभर छातीतील वेदना सहन करीत त्याने अखेर शुक्रवारी रात्री मेडिकलमध्ये प्राण सोडले.अवघ्या २२व्या वर्षी त्याने अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दरारा निर्माण केला होता. दाऊद कराचीत पळून गेला तर, छोटा राजनने मलेशियात हातपाय पसरले. त्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये सर्वाधिक प्रभाव डॉन अरुण गवळीच्या टोळीचा होता. त्याला काटशह देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमर नाईकच्या टोळीला धडा शिकवण्याचा कट गवळी टोळीने रचला. त्यानुसार, १० एप्रिल १९९४ला गवळी टोळीचा शूटर रवी सावंत याने कोर्टाच्या परिसरात शिरून अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईक याच्यावर गोळी झाडली. डोक्याला मागच्या बाजूने गोळी लागल्याने अश्विन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. सोबतच त्याच्या बाजूला असलेले तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अश्विनचा गेम करण्यासाठी कुख्यात सावंत वकिलासारखा वेश परिधान करून कोर्टाच्या आवारात शिरला होता. त्याने झाडलेली गोळी डोक्यातून आरपार निघूनही अश्विन वाचला. मात्र, त्याच्या कंबरेखालचा भाग अधू झाला होता. नाईक टोळीही बॅकफूटवर गेली होती. या हल्ल्यामुळे गवळी टोळीसोबत रवी सावंतचीही दहशत तीव्र झाली होती. त्यामुळे त्याच्यावर टाडा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कोर्टात जलदगतीने प्रकरण चालविण्यात आले. ७ सप्टेंबर १९९६ ला या गुन्ह्यात सावंतला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी तो २४ वर्षांचा होता. त्यावेळी कारागृहांमध्ये देखील अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या गुंडांमध्ये धुसफूस अन् हल्ले सुरूच होते. त्यामुळे १९ सप्टेंबरला सावंतला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. अंडरवर्ल्ड अन् अय्याशीच्या जीवनाची चटक असलेल्या सावंतला प्रारंभी आतल्या आत बऱ्यापैकी रसद मिळत असल्याने त्याने १४ वर्षे कारागृहात काढली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करून आपण १४ वर्षे शिक्षा भोगल्यामुळे आता मुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप बघता कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली. तेव्हापासून सावंत कमालीचा निराश झाला होता.रवी सावंत (बंदी क्र. सी-४७४०) याची विड्यांच्या थोटकांसाठीही मारामार होती. फुफ्फुसाचा विकार जडलेल्या सावंतला नातेवाईकांची नेहमीच प्रतीक्षा असायची. २० वर्षांपासून बंदिस्त असल्याने बाहेर पडायची त्याची धडपड होती. मात्र शिक्षेतून मुक्ती मिळण्याऐवजी त्याला जीवनातून कायमचीच मुक्ती मिळाली.