ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ११ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणी ऑटो मेन्स रिक्षा युनिअनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे. अंधेरीत गुरुवारी रात्री झालेल्या रिक्षा जाळपोळनंतर शशांक राव यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणीदेखील केली आहे. स्त्यालगत उभी असलेल्या एका रिक्षाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना गुरुवारी रात्री अंधेरी आरटीओ बाहेर घडली.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार शशांक राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रिक्षाचालकांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करणार आहेत. अंधेरीत रिक्षा जाळण्यात आली तिथे मनसेचा झेंडा सापडला होता, त्यामुळे यामध्ये मनसेचा हात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी शशांक राव यांनी केली आहे.
एका उदयोगपतीला कोट्यावधींचा नफा मिळवून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे काम राज्य शासनाकडून सुरु असल्याचा आरोप बुधवारी राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्यास रिक्षा चालकास आणि प्रवाशाला बाहेर काढून ती रिक्षा जाळून टाका असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते.