- मंगेश व्यवहारे, नागपूर
संसारात रमण्याच्या वयात विमलातार्इंनी अनाथालयाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विमलाताई आज शेकडो निराधार मुलांच्या माय बनून राहिल्या आहेत. विमलताई आळे यांंनी विड्या वळून दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. दहावीनंतर त्यांना शिक्षक म्हणून ५० रुपये मासिक वेतनावर नोकरी लागली. नोकरी व ग्रामीण भागात समाजकार्य सुरू असताना, डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. कौशल्यायन यांनी अनाथ मुलांसाठी निराश्रित गृह सुरू केले होते. परंतु त्यांच्याकडे गृहमाता नव्हती. त्यांनी विमलताईंना अनाथांची आई होशील का?, अशी विचारणा केली. तरुण वयात विमलताईंनी ही जबाबदारी स्वीकारली. उत्तर नागपुरातील जयभीम चौकात हे अनाथालय होते. विमलताईंवर सुरुवातीला पाच मुलांची जबाबदारी होती. अनाथालयाला उत्पनाचे साधन नव्हते, सुविधाही नव्हत्या. विमलताई कामठीतील शाळेत नोकरी करून अनाथालय सांभाळायच्या. मुलांची संख्या वाढत असताना पोटाला चिमटा काढून त्या अनाथ मुलांची भूक भागवू लागल्या. या वेळी काशीनाथ मेश्राम त्यांच्या मदतीला धावून आले. विमलताई व मेश्राम यांनी वर्गणी गोळा करून, पुस्तके विकून अनाथालयाचा गाडा चालविला. तीन वर्षानंतर अनाथालयाला ग्रॅण्ट मिळू लागली. विमलाताईंनी नोकरी सोडली. अनाथालयाचे ‘राहुल बालसदन’ असे नामकरण केले. अडचणींवर मात करून विमलातार्इंनी बालसदन नावारुपाला आणले आहे. बालसदनमधील १४ मुलींची त्यांनी लग्न करून दिली. आतापर्यंत २५० वर मुलामुलींचे संगोपन केले आहे. सध्या त्यांच्याकडे ३० मुले आहेत. मी जर संसारात रमले असते, तर एक दोन मुलांचाच सांभाळ करू शकले असता. सध्या २५० वर मुलांना सांभाळून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून, सक्षम करू शकले, याचे फार मोठे समाधान मला आहे. - विमलताई आळे, संचालक, राहुल बालसदन