- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात मुलीचे आक्षेपार्ह फोटो क्लिक करत ते मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या तरुणाला एका महिला प्रवाशाने चांगलाच धडा शिकविला. तिने त्याचा हा प्रताप उघडकीस आणत त्याच व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी पोस्ट केली आणि अश्लील कमेंट्स मारणाऱ्या मित्रांचीही बोलती बंद केली. नीलेश वेद (२६) असे अटक आरोपीचे नाव असून तो बँकेत काम करतो.तक्रारदार तरुणी ११ जुलैला रात्री ९.३० वाजता चर्चगेटहून बोरीवलीकडे जाणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून पुरुष सहकाऱ्यांबरोबर प्रवास करत होती. सुरुवातीला तिच्यासमोर बसलेला वेद दुसरीकडे जाऊन लोकलच्या त्याच डब्यातील मुलीचे फोटो मोबाइलमध्ये काढत असल्याचा संशय तिला आला. तिने त्याला वेळीच रोखून त्याच्या मोबाइल हिसकावला. तेव्हा त्यात तिचेही फोटो असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तसेच त्याने हे फोटो मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले. त्यावर अश्लील कमेंट्सही आल्या होत्या. तरुणीने त्याला धडा शिकविण्यासाठी रेल्वे हेल्पलाइनवर संपर्क साधला. पण त्यावर संपर्क न झाल्याने १०० क्रमांकावर तक्रार नोंदविली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)च्या जवानांनी मालाड येथे वेदला ताब्यात घेतले. त्यानंतर बोरीवली रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. वेदविरुद्ध गुन्हा दाखल होताच या तरुणीने एफआयआरची कॉपी त्याच्याच मोबाइलवरून त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली.