ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ‘ती सध्या काय करते?’ या गमतीशीर प्रश्नावरून सध्या सर्वत्र धुमाकूळ असून त्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. मात्र ही कॅचलाईन हेरत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्या माध्यमातून नोटाबंदी, गरिबीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ' ‘ती सध्या काय करते?’ असा प्रश्न कोणी विचारलाच तर आम्ही सरळ सांगून टाकू की, गेल्या पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे, परिस्थितीशी झगडत आहे. भविष्याच्या चिंतेने ती ग्रासली आहे' अशा रोखठोक शब्दांत उद्धव ठाकरेंनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी ही टीका केली असून देशातील महिलांची परिस्थिती, त्यांना सोसावे लागणारे हाल, त्यांचे दु:ख या सर्वांना वाचा फोडली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
> 'ती' भविष्याच्या चिंतेने ग्रासली आहे. दिल्लीच्या भररस्त्यावर ती स्वतःच विवस्त्र झाली व आक्रोश केला, तर अनेक ठिकाणी ‘नोटाबंदी’च्या अत्याचाराने ती तडफडून मेली. तिला सध्या अस्वस्थ वाटतंय. तिच्यातील आई, पत्नी, बहीण, आजी ही सर्व नाती नोटाबंदीच्या रांगेत मूक आणि बधिर होऊन उभी आहेत. तिला कोणी विचारलेच की, ‘‘बाई, तू काय करतेस?’’, तर ती धाय मोकलून रडू लागते. काँग्रेजी राजवटीत जे भोगायला लागले नाही ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे असा दोष स्वतःच्याच नशिबाला देते. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना बसला आहे. या व्यवसायांतील अनेकांना रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे.
> या बेरोजगारीची टांगती तलवार डोक्यावर असलेली ‘ती’ विचारत आहे की, ‘‘माझ्या नवऱयाची, माझ्या मुलाची उद्या नोकरी जाईल. माझी चूल विझेल. त्याला कोण जबाबदार?’’ बांधावर राबणारी ‘ती’ विचारते आहे, ‘‘कालपर्यंत दुष्काळ, नापिकी, गारपीटीने शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यंदा पाऊस बरा झाला. पीकपाण्याचीही कधी नव्हे ती बरकत आली. पण हाय रे दैवा, नोटाबंदीच्या निर्णयाने या बरकतीवरच कुऱहाड घातली. नोटाबंदीचा फटका बसल्याने माझ्या धन्याने काबाडकष्ट करून पिकवलेली वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटो, हरभरा रस्त्यावर टाकावा लागला. या धक्क्याने माझ्या धन्याने जीवाचे काही बरेवाईट करून घेतले तर मी व माझी पोरेबाळे काय करू?’’
> देशभक्तीच्याच गोळ्या खाऊन पोट भरता येत होते मग सीमेवर इतके जवान का मारले जात आहेत? कश्मीरच्या सीमेवर शहीद झालेल्यांची ‘ती’सुद्धा दुःखातून आणि धक्क्यातून सावरायला तयार नाही. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी झाल्याच्या बातम्यांकडे ती अफवा म्हणून बघते. भिंतीवर लटकवलेल्या शहीद पती आणि पुत्राच्या तसबिरीला प्रश्न विचारीत आहे. ‘‘पाहा, नोटाबंदीमुळे सीमेवर रक्तपात थांबला आहे. नोटाबंदीमुळे उद्या अखंड कश्मीरचे स्वप्न साकार होईल. मग तू ‘नोटाबंदी’ची घोषणा होईपर्यंत का थांबला नाहीस? नोटाबंदीनंतर सीमेवर गेला असतास तर जगला असतास, कुटुंबात राहिला असतास.’’
> बाराबंकीतील छोटूलालची स्वर्गस्थ आई काय करत असेल? आईच्या अंत्यसंस्कारासाठी बँकेने छोटूलालला पैसे दिले नाहीत. दोन दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे घरातील गहू विकून मातेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मुलावर आणली, म्हणून ती आई आशीर्वाद देत असेल की, तिच्या मुखातून शापवाणी बाहेर पडत असेल? प्रश्न अनेक आहेत, पण एकंदरीत काय तर ‘ती’ अस्वस्थ आहे. हतबल आहे. अगतिकतेने सारे काही पाहते आहे. परिवर्तनाची नवी पहाट आणि ‘अच्छे दिन’चा हा भरकटलेला प्रवास पाहून ती गोंधळली आहे. अध्यादेशांचा विक्रम होत असताना एखादा अध्यादेश अयोध्येतील राम मंदिरासाठी काढायला काय हरकत आहे, असेही तिला वाटते. समान नागरी कायद्याबाबतही असाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करते आहे. ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या पडद्यावर वेगळे आहे व प्रत्यक्ष जीवनात वेगळे आहे. ती रांगेत उभीच असल्याने तिच्याकडून वेगळे काही घडेल असे वाटत नाही. ‘चूल आणि मूल’च्या बेडय़ा तोडून ती फक्त रांगेतच उभी आहे. व्वा, यालाच म्हणतात महिलांचे सबलीकरण!