आत्महत्येच्या वाटेवरून माघारी : आता देतेय अपंगांच्या न्यायासाठी लढासुमेध वाघमारे - नागपूरसुंदर भविष्याचे स्वप्न सोबत घेऊन येणाऱ्या ऐन तारुण्यातच आजाराने घेरले अन् आयुष्यभराचं अपंगत्व नशिबी आले. नाही म्हणायला आई-वडील आहेत, पण मजुरी करून ते तरी किती मदत करणार. प्रत्येक पावलावर दु:ख, दारिद्र्य, यातना़पण ती खचली नाही़ जिद्द आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर तिने लाचारी झुगारली अन् अपंग बांधवांच्या उत्कर्षासाठी एल्गार पुकारून लांब गडचिरोलीतून एकटीच आज नागपुरात आली. अशा या रणरागिणीचे नाव आहे प्रतिभा इंदूरकऱ २८ वर्षीय प्रतिभा इंदूरकर ही गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव येथून विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या मोर्च्यासाठी आज नागपुरात आली होती़ आपल्या न्याय हक्कासाठी मोर्च्यात नारे लावणाऱ्या प्रतिभेला बोलते केले तेव्हा ती म्हणाली, दहावीत असताना अचानक पायाला सूज आली. ती नंतर वाढतच गेली. डॉक्टरांना दाखविल्यावर जीव वाचविण्यासाठी त्यांनी पाय कापण्याचा सल्ला दिला. हातावर कमवून पानावर खाणाऱ्या आई-वडिलांवर सकंट कोसळले. शेवटी निर्णय झाला. पाय कापलाच गेला. शुद्धीवर आली तेव्हा खूप रडले. आयुष्य संपले म्हणून आत्महत्येचा प्रयत्नही केला. परंतु डॉक्टरांनी समजावले. माझ्यासारख्या अनेक अपंग बांधवांना भेटवून दिले. जगण्याचे बळ मिळाले. परंतु अपंग म्हणून पदोपदी अवहेलनाच यायची. साध्या विकलांगाचे प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले़ पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी भटकले. परंतु प्रत्येकवेळी शारीरिक अपंगत्व आड आले. सामान्याच्या तुलनेत हजारपट काम करण्याची ताकद असतानाही अपंग म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करण्यास भाग पडले. पदोपदी चीड, संताप पदरी पडत गेले. दुसऱ्या अपंग बांधवांना भेटताना त्यांच्याही याच समस्या असल्याचे लक्षात आले. आजघडीला राज्यभरातील अपंगांची संख्या काही कोटींच्या घरात असली तरी अपंगांना राजकीय व्यासपीठ नसल्याची तिची खंत आहे. अपंगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय, अपंगांना सरकारी नोकऱ्यात तीन टक्के आरक्षण, अपंग आर्थिक विकास महामंडळ, अपंग आणि गटई कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्टॉल्सची उभारणी, शासकीय निमशासकीय नोकर भरतीत अपंगांसाठी स्पर्धा परीक्षेची अट रद्द करावी, असे अपंगांचे अनेक प्रश्न तडीस नेण्याचा तिचा निर्धार आहे.
शारीरिक व्यंग विसरून तिने पुकारला एल्गार
By admin | Published: December 09, 2014 12:56 AM