पाटस : येथील टोल नाक्यावर पुणे-सोलापूर बसमध्ये एका गर्भवती महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, टोलनाक्याच्या आपत्कालीन विभागातील रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिला आणि तिचे बाळ सुखरुप बचावले असल्याने ‘‘देव तारी त्याला कोण मारी’’ या म्हणीची प्रचीती बसमधील प्रवाशांना अनुभवावयास मिळाली.पुणे-सोलापूर बसमधून नीळकंठ हिरेमठ (वय २८) आणि त्यांची पत्नी नीलम हिरेमठ (वय २५, दोघेही रा. माशाळ, कर्नाटक) ही महिला आणि तिचा पती प्रवास करीत होते. वरवंड पाटसच्यादरम्यान या महिलेला त्रास होऊ लागल्याने बसचालकाने एसटी कंट्रोल रूमला संपर्क साधला. तोपर्यंत एसटी पाटस टोल नाक्याच्या लेन १४ मध्ये आली होती. या वेळी एसटी थांबली. चालक आणि वाहक यांनी तातडीने टोल नाक्याच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. बसमधील प्रवासी खाली उतरले. टोल नाक्याच्या आपत्कालीन विभागाच्या संगीता गायकवाड, संजय देशमाने, सिंधू पानसरे ही मंडळी तातडीने बसमध्ये गेले. तेव्हा संबंधित महिला मदतीची याचना करीत होती. त्यानंतर या महिलेने मुलीला जन्म दिला. या वेळी संंबंधित महिलेला टोल नाक्यावरील आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलासा दिला. त्यानंतर टोल नाक्याचे नियंत्रक किरण नवले यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पाटसमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)
एसटीमध्ये तिने दिला मुलीला जन्म
By admin | Published: September 12, 2016 2:25 AM