पुणे : आपल्या हुशारीच्या जोरावर आणि कौटुंबिक परिस्थितीवर मात करत इटलीमधील युनायटेड वर्ल्ड महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत असलेल्या प्रियांका पाटील या विद्यार्थिनीने हुजूरपागेतील दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शाळेचीच माजी विद्यार्थिनी असल्याने प्रियांकाने उपस्थित मुलींशी अतिशय मोकळेपणाने संवाद साधला. कौटुंबिक प्रतिकूलता, आईचे अल्पशिक्षितपण, आर्थिक ओढाताण यांसारख्या परिस्थितीतून मार्ग काढत प्रियांकाने ही झेप घेतली आहे. परदेशात जाऊन शिकणे, तेथील परिस्थितीशी जुळवून घेताना आलेले अनुभव यांचे किस्से सांगत कोणतीही परिस्थिती आल्यास न थांबता त्यावर योग्य पद्धतीने मात करता येते, असे प्रियांका अतिशय आत्मविश्वासाने सांगत होती. आणि उपस्थित मुलीही आपल्या मनातील विविध शंका विचारून तिच्याशी संवाद साधत होत्या. आयुष्यात कोणतेही ध्येय गाठताना आपल्या हिताचा विचार करणारी व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवा, असे सांगत आईच्या आठवणींवर आपण परदेशात सुरक्षित असतो असे ती सांगते. प्रियांकाच्या या अनुभवकथनाने अनेक विद्यार्थिनी भारावून गेल्याचे चित्र होते. या वेळी दहावीच्या ४०० विद्यार्थिनींसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुभाष महाजन यांचे महत्त्वाचे योगदान होते. (प्रतिनिधी)
तिने केले विद्यार्थिनींना मार्गदर्शन
By admin | Published: August 26, 2016 12:56 AM