- विलास जळकोटकर
सोलापूर, दि. ०७ - दैवाने जरी केली अवकृपा,तरीही ना कधी डगमगले।जिद्द एकचि मनी राखिली,यश खुणावतेय पुढे पुढे।।मध्यमवर्गीय कुटुंब... परिस्थितीही तशी बेताचीच... आई घरोघरी पायपीट करुन डाळिंब विकते. वडिलांचा कापडाचा जेमतेम छोटासा व्यापार... पोटी जन्मताच हात आणि पाय नसलेल्या कन्येचा जन्म झाला... पण माऊली हटली नाही. पदरी मिळालं पवित्र झालं मानून घेत अशातही या पोरीला ममतेनं वाढवलं. नावही तिचं ममताच ठेवलं. याच ममतानं आईच्या श्रमाच्या घामाचं चिज करीत हात-पाय नसल्याचा न्यूनगंड न बाळगता अतूट इच्छाशक्तीच्या बळावर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चक्क ६६.६० टक्के गुण मिळवून चार चाँद लावले आहेत.गुरुनानक चौक परिसरातील कुर्बान हुसेन नगर मध्ये राहणारे सरला आणि चंदुलाल थदानी यांना पहिलेच अपत्य असलेली कन्या ममता जन्मताच अपंग म्हणून जन्माला आली. परिस्थितीने नाडलेल्या थदानी कुटुंबीयांना हा धक्का होता. पण यातूनही ते सावरले. आई सरला हटली नाही. ममतेने तिला खूप मोठं करण्याचा निर्धार केला. शाळेत जाण्याचं तिचं वय होताच अनेक खटपटी करुन तिनं प्रकाश यलगुलवार यांची भेट घेतली. तिला शाळेत घेण्याची विनंती केली अन् चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतून तिच्या शाळेचा श्रीगणेशा सुरु झाला. अगदी दहावीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या पैशाविना तिचं शिक्षण पार पडलं.शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या ममताच्या अंगी अभ्यास आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मात्र विशेष रस होता हे जाणवल्यामुळेच लहानपणापासूनच तिच्यावर विशेष लक्ष ठेवले... ममताची आई सांगत होती. दिवसभर डाळिंब विकण्यासाठी बाहेर पडावं लागायचं. तिच्या वडिलांचाही कापडाचा छोटा व्यापार असल्यानं शाळेत जाण्यासाठी दररोज रिक्षा लावली. घरात मावशी सारं काही बघायची. आज दहावीच्या परीक्षेला पोरीनं आपल्या अपंगत्वावर मात करीत ६६ टक्के गुण मिळवले यासारखा आनंद माझ्या आयुष्यात कोणताच नसल्याचे भावोद्गारही आई सरितांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना काढले.
साहेब, मी कलेक्टर होणार
तत्कालिन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या उपस्थित कार्यक्रमाच्यावेळी एकदा चिमुकल्या दिसणाऱ्या ममताची भेट झाली. तिची चुणचुणीत, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि धीटपणा पाहून गेडाम भारावले. सहजच त्यांनी तिला बाळा तू काय होणार असे विचारले. तिने कोणताही विचार न करता ताडकन् साहेब मी कलेक्टर होणार! खूप शिकणार आणि आई-वडिलाचं नाव मोठ्ठं करणार असे उत्तर दिले होते याची आठवण आई सरितांनी यावेळी करुन दिली. आज ( सोमवारी) ह्यलोकमतह्णशी बोलतानाही तिने आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला.
आई माझी गुरु !
जन्मताच मी अपंग म्हणून जन्मले तरी आईने मोठ्या मायेने वाढवून शिकण्यासाठी माझ्यामध्ये जिद्द निर्माण केली. यामुळे आई हीच माझी सर्वप्रथम गुरु असल्याची प्रांजळ कबुली ममताने यावेळी दिली. आपल्या या यशामध्ये यलगुलवार प्रशालेचे सर्व शिक्षक आणि ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी आणि संगीता भतगुणकी यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवला. यामुळेच मी यश मिळवू शकले. आता कलेक्टर झाल्याशिवाय मागे वळायचे नाही असा निर्धार ममताने व्यक्त केला.