पंढरपूर : अमेरिकेतील गावांचा कारभार ग्रामपंचायती पाहत नाहीत. परंतु भारतामध्ये ग्रामीण भागाचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासन पाहत असते़ या ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील विद्यार्थिनी डॉ. अॅलिसा हेन्झे ही पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देणार आहे.
डॉ. अॅलिसा हेन्झे ही संशोधक बोस्टन युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील प्राध्यापक रचेल ब्रूल आणि लंडन युनिव्हर्सिटी, नेदरलँड येथील संशोधक सायमन चौचर्ट यांच्या वतीने स्थानिक सर्वेक्षण करण्यासाठी भारतात आली आहे.
डॉ. अॅलिसा हेन्झे ‘महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत आणि स्थानिक शासन’ या विषयावर जानेवारी २०२० पासून महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यातील जास्तीत जास्त ७०० ग्रामपंचायतींचा अभ्यास करणार आहेत. हा अभ्यास गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेशी संबंधीत असून प्रा. राजस परचुरे हे संपर्कप्रमुख आहेत. डॉ. अॅलिसा हेन्झे यांना सहाय्यक संशोधक क्रांती माने या मदत करत आहेत.
डॉ. अॅलिसा हेन्झे म्हणाल्या, अमेरिकेच्या राजकारणामध्ये महिलांचा जादा सहभाग नाही. तसेच भारतीय राजकारणामध्ये महिलांना आरक्षण आहे. महाराष्टÑातील ग्रामपंचायतीचा कारभार महिला कशा पद्धतीने चालवतात. त्या ठिकाणच्या कामकाजाबाबतची माहिती घेणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा व मोहोळ तालुक्यातील गावांनाही भेट देणार आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील २४ गावांचा समावेश आहे. सध्या पंढरपूर पंचायत समितीला भेट दिल्याचे त्यांनी सांगितले़ त्यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी ग्रामपंचायतीबाबत माहिती सांगितली. काही दिवसांनी त्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत.तसेच डॉ. अॅलिसा हेन्झे व क्रांती माने यांचा सत्कार पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, झेडपी सदस्य तानाजी वाघमोडे, कान्हापुरीच्या सरपंच स्मिता पाटील, सहायक सुरेश पिसे यांनी केला.
मराठी भाषेचे उत्तम ज्ञान - महाराष्टÑातील राजकारणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने डॉ. अॅलिसा हेन्झे या पाच वर्षांपूर्वी अमेरिकेतून भारतात आल्या आहेत. परंतु महाराष्टÑात अभ्यासाच्या दृष्टीने फिरत असताना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. हे ओळखून २ वर्षांच्या कालावधीत उत्कृष्ट मराठी शिकून घेतली आहे. त्या महाराष्टÑात ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी मराठी बोलत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे़