वसई : वाहतूक नियमांचें उल्लघन करून भंगार बस चालवण्यास मनाई करणारी नोटीस परिवहन खात्याला बजावली असतांनाही ठेकेदाराने तिला न जुमानता ही बस पुन्हा रस्त्यावर आणल्याचे उघडकीस आले आहे. वसई विरार पालिकेची परिवहन सेवा भगिरथी ट्रान्सपोर्ट कंपनी या खाजगी ठेकेदारामार्फत सेवा चालवली जाते. पालिकेच्या ११९ आणि या ठेकेदाराच्या मालकीच्या ३० बसेस आहेत. परंतु ठेकेदाराच्या बसेस अत्यंत भंगार असून त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असतो. बसेसमध्ये काचेच्या ऐवजी लाकडी प्लाय बसविण्यात आलेला होता. तसेच सीट्स तुटलेल्या होत्या. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दोन बसेसची वाहतूक थांबवण्याच्या (स्टॉप आॅपरेशन्सच्या) नोटीसा बजावल्या होत्या. म्हणजेच या बसेसने वाहतूक करणे थांबवावे आणि दुरूस्ती केल्या नंतरच त्या रस्त्यावर आणाव्यात असा तो आदेश होता.मनाई असतानाही एमएच ४८ के २३९ या क्रमांकाची बस पुन्हा प्रवाशांना घेऊन वाहतूक करीत होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही बस सोमवारी दिसल्यानंतर त्यांनी भरारी पथकास पाचारण करून आचोळा येथे बस अडवली. त्यानंतर बसचालक आणि ठेकेदारास पुन्हा स्टॉप आॅपरेशन्स आणि सरकारी आदेशांचे उलंघन केल्याची नोटीस बजावण्यात आली. परिवहन सेवेच्या बसेसमध्ये अनेक त्रुटी आहेत. याशिवाय या जुनाट बसेस मधून धूर निघत असतो. अशा बसेसचे क्रमांक वारंवार देऊनही कारवाई होत नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात कारवाई करायला हवी असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तर पोलिसांकडेही अधिकार असल्याने त्यांनी कारवाई करायला हवी असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >वाहतूक पोलीस, आरटीओ झटकतात हातदोन खात्यांकडून कारवाईबाबत एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याने बस ठेकेदाराचे फावत असून तो भंगार बसेस चालवत आहे. परिवहन ठेकेदार प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला जुमानत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी सांगितले.
‘ती’ भंगार बस पुन्हा रस्त्यावर
By admin | Published: August 25, 2016 3:18 AM