मुंबई : शीना बोराची हत्या गळा दाबून झाली असल्याचे या प्रकरणातील आरोपी आणि वाहनचालक श्यामवर राय याने बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात सांगून एकच खळबळ उडवून दिली. या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याचा विनंती अर्ज त्याने न्यायालयापुढे केला आहे. शीना बोराची गळा दाबून हत्या करण्यात आली असून, मी या गुन्ह्यात सहभागी होतो. या कृत्याचा आपल्याला पश्चाताप असून माझ्या समोर ही घटना घडल्याचे त्याने कबुल केले आहे. मला माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी द्या, अशी विनंती त्याने केली आहे. याची नोंद करून घेत न्यायालयाने सीबीआयला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.शीना बोरा हत्याकांड प्रकरणात श्यामवर राय याच्यासह तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणी मुखर्जीचा नवरा पीटर मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना हे सर्वजण आरोपी आहेत. सध्या सर्वजण कोठडीत आहेत. राय हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर आहे. शीनाची हत्या झाली, तेव्हा राय इंद्राणीसोबत होता. सीबीआयने या हत्येच्या दिलेल्या घटनाक्रमानुसार इंद्राणी, संजीव खन्ना व राय हे शीनासोबत घटनेच्या दिवशी एकाच गाडीत होते. त्यावेळी परदेशात असलेला आरोपी पीटर मुखर्जी मोबाईलवर सतत इंद्राणीच्या संपर्कात होता. शीनाची गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक दावा रायने केला आहे. तरीदेखील ही हत्या आपण केली नसून या हत्याप्रकरणात आपल्याला गोवले गेल्याचे इंद्राणी, पीटर व संजीवचे म्हणणे आहे. रायने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केल्याने या तिन्ही आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत.मला माफीचा साक्षीदार व्हायचे आहे, असे पत्र रायने गेल्या शुक्रवारी न्यायालयाला लिहिले. हे पत्र बुधवारी न्यायालयात पोहोचले. राय व अन्य आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी या पत्राबाबत न्यायालयाने रायकडे विचारणा केली. तुझ्यावर कोणाचा दबाव आहे का? किंवा तुला कोणी धमकावत आहे का? असे प्रश्न न्यायालयाने रायला केले. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही व मला कोणीही धमकावले नाही. पण केलेल्या कृत्याचा मला पश्चाताप असून मला सर्व मान्य करायचे आहे, असे रायने न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.एप्रिल २०१२ मध्ये शीनाची हत्या झाली. तिचा मृतेदह रायगड येथील गागोदे गावात सापडला होता. गेल्यावर्षी पोलिसांनी या हत्येप्रकरणी राय, इंद्राणी, संजीवला अटक केली. त्यानंतर याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने पीटरलाही अटक केली. या आरोपींविरोधात सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले. आरोपपत्र दाखल झाल्याने यात जामीन मिळावा, यासाठी पीटरने न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. (प्रतिनिधी)
‘शीनाची हत्या गळा दाबूनच’
By admin | Published: May 12, 2016 4:35 AM