मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाला असतानाच केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व होमगार्डचे विद्यमान महासंचालक राकेश मारिया यांच्यासह तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. चौकशीचा संदर्भ आणि तपशील याविषयी ‘सीबीआय’ने काहीही स्पष्ट केले नसले तरी गरज पडल्यास पुरवणी आरोपपत्र सादर केले जाईल, असे संकेत दिले आहेत. मारियांसह मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती व परिमंडळ-९चे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनाही चौकशीसाठी बोलाविले होते. सुमारे तीन तास चाललेल्या चौकशीत या तिघा अधिकाऱ्यांनी शीना बोरा हत्येचा तपास मुंबई पोलिसांनी कशाप्रकारे केला? कोणत्या बाबींची पडताळणी केली? कोणते पुरावे तपासले? याबाबत विचारण्यात आले. खटल्याच्या सुनावणीची तारीख निश्चित झाली असताना आकस्मिकपणे तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपासणी करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. कॉर्पोरेट जगतात खळबळ उडवणाऱ्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा नवरा पीटर मुखर्जी यांच्यासह चालक श्यामकुमार व इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)शीना बोरा खुनाबाबत खार पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह भारती व मारिया यांनी वारंवार पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाचा तपास केला होता. सीबीआयकडून याचाही आढावा घेतला जात आहे.
शीना बोरा हत्याकांड; मारिया यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 5:05 AM