मुंबई : शीना बोरा हत्या खटल्यात साक्ष देणाऱ्या साक्षीदारांची यादी शुक्रवारी सीबीआयने बचावपक्षाच्या वकिलांना सादर करत, खटला चालवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. २३ फेब्रुवारीपासून खटल्याला सुरुवात होईल, असे विशेष सीबीआय न्यायालयाने स्पष्ट केले.या केसमधील आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्या वकिलांना शुक्रवारी सीबीआयच्या वकिलांनी साक्षीदारांची यादी दिली. पुढे या केसमध्ये गुंतागुंत होऊ नये, यासाठी विशेष न्यायालयाने बचावपक्षाच्या वकिलांना ही नावे उघड न करण्याचे आदेश दिले. खटल्यादरम्यान कोणतीही सबब पुढे करून सुनावणी तहकूब करण्याची वेळ येऊ नये, यासाठी विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना आवश्यक असलेले कागदपत्र संबंधित प्रशासनाकडून मिळवण्यासाठी, जेल प्रशासनाला आधीच माहिती देण्याचेही निर्देश दिले.पीटरने काहीच दिवसांपूर्वी इंद्राणीने दोन बँकांच्या चेकवर त्याची बनावट सही केल्याचा आरोप केला आहे. पीटरच्या म्हणण्यानुसार, इंद्राणीने सिंडीकेट बँक आणि न्यूझीलँडच्या वरळी अँड एएनझेड बँकेमध्ये दोघांचे संयुक्त खाते आहे. या दोन्ही बँकांतून इंद्राणीने पीटरची बनावट सही करून पैसे काढले आहेत. दरम्यान, न्यायालयाने बँकांना वैयक्तिकरीत्या खात्री करून घेतल्याशिवाय चेक न वटवण्याचे निर्देश दिले. एप्रिल २०१२ मध्ये शीनाची हत्या केल्याचा आरोप इंद्राणी, पीटर व संजीव खन्नावर ठेवण्यात आला आहे. शीनाचा ड्रायव्हर श्यामवर राय याला विश्ेष न्यायालयाने माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)
शीना बोरा हत्या खटल्याला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात
By admin | Published: February 19, 2017 1:35 AM