ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. १७ : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना पदावरुन अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिला आहे. अपात्र नगरसेवकांमध्ये काँग्रेसच्या तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी करणाऱ्या नगरसेवकांचा समावेश आहे.
शेगाव नगर पालिकेच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक २६ मार्च २०१५ रोजी पार पडली. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस कडून रिंगणात असलेल्या शैलेंद्र पाटील यांचा ११ विरुद्ध १३ मतांनी पराभव झाला. तर भाजपाच्या मदतीने काँग्रेसबाह्य गटाच्या सौ.शारदा गोपाल कलोरे यांनी १३ मते मिळवून विजय खेचून आणला. त्यामुळे नगराध्यक्षा सौ. शारदाताई कलोरे व भाजपाच्या उपाध्यक्ष पदासाठी मदत करणाऱ्या नगरसेवक सौ. योगिता अग्रवाल, सौ.सुनिताताई कलोरे आणि किरणबाप्पू देशमुख यांना अपात्र घोषित करण्या करीता कांग्रेसचे गट नेते शिवाजी बुरुंगले यांनी १० एप्रिल रोजी २०१५ रोजी चौघांविरूद्ध जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकड़े प्रकरण दाखल केले.
तर नगरविकास आघाडीमधून भारतीय राष्ट्रीय पक्षात प्रवेश घेणाऱ्या माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह नगरसेवक संदीप काळे, रविंद्र रायणे, नगरसेविका सौ.रूपाली दिनेश शिंदे, सौ.ज्योती विजय गणोरकार, सौ.उषा विठ्ठल डाबेराव यांच्या विरूध्दही अवैधरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबाबत अपात्र करण्यासाठी सौ.शारदा कलोरे यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केले. दरम्यान ८ महिन्यापुर्वी दोन्ही प्रकरणात आरोप सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी सर्वांना अपात्र घोषीत केले. त्यानंतर दोन्ही गटांनी नागपूर उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. न्यायालयाने प्रकरणाची तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निकाल देतांना नियमांची पुर्तता न करता त्रुट्या ठेवल्याचे आढळून आल्याचे म्हटले.
त्यामुळे नियमांची पुर्तता करून फेरनिकाल द्यावा असे आदेशही न्यायालयाने दोन महिन्यांपुर्वी दिले. या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ.झाडे यांनी आघाडीप्रमूख ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, गटनेते शिवाजी बुरूंगले यांचे जवाब नोंदविले व न्यायालयाच्या निदेर्शानुसार १५ आॅक्टोबर रोजी निकाल राखीव ठेवला. दरम्यान सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष सौ.शारदा कलोरे यांच्यासह दहाही नागरसेवकांना अपात्र घोषीत केले आहे.
शिवाजी बुरुंगले आणि शैलेंद्र पाटील यांच्यातर्फे अॅड.संतोष राहाटे व अॅड.विरेंद्र झाडोकार यांनी तर सौ.शारदा कलोरे यांच्यावतीने अॅड.ए.एन.अग्रवाल यांनी काम पाहिले. दरम्यान या निकालामुळे शहरातील राजकीय समिकरण झपाट्याने बदलणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालानंतर हे दहाही नगरसेवक परत नागपूर उच्च न्यायालयात अपिल दाखल करून स्थगनादेश आणि कॅव्हेट मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रयत्न करणार आहेत.