मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्तांचे मुंबईतील स्थलांतर वाढले आहे. मुंबईत स्थलांतरित झालेले हे दुष्काळग्रस्त फ्लायओव्हरखाली अथवा मिळेल त्या जागी आपले बिऱ्हाड मांडत आहेत. परंतु येथेही त्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. परिणामी दुष्काळग्रस्तांच्या निवाऱ्याची नीटनेटकी व्यवस्था व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन महापालिकेला धाडण्यात आले आहे.गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना यासंबंधीचे निवेदन पाठविले आहे. निवेदनात मुंबईत स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांना महापालिकेच्या शाळा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. मुंबईत स्थलांतरित झालेले बहुसंख्य दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आहेत. विशेषत: लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांची संख्या मोठी असून, सध्या त्यांचे वास्तव्य घाटकोपरमधल्या भटवाडी येथील दत्ताजी साळवी मैदानात तात्पूरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या तंबूत आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांना महापालिकेच्या शाळेत निवारा
By admin | Published: April 26, 2016 2:35 AM