Jayant Patil News: महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. भाजपाने एकमागून एक उमदेवार घोषित केले आहेत. असे असले तरी उमेदवारीवरून अनेक कयास बांधले जात आहे. रायगडमधून सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. यावरून जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
तिकीट वाटप अंतिम झाले की, देशातील चित्र बदलेले दिसेल. सुनील तटकरे अपयशी खासदार असून, ते पडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्तेही असेच सांगतात. अनेक जण नाईलाजाने त्यांच्यासोबत असल्याचेही अनेकांकडून ऐकायला मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच अनंत गीते यांनी भले कमी काम केले असेल. परंतु, त्यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क चांगला आहे. विशेष म्हणजे अनंत गीते यांच्यावर कोणताही डाग नाही. हे त्यांचे मोठे भांडवल आहे, असे शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितले.
खासदार म्हणून पाच वर्षांत काही कामे केली नाहीत
सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, जनतेची थोडी थोडकी कामे केली असली, तरी आमच्याशी संपर्क ठेवला नाही, हा आमचा राग होता. मात्र, पाच वर्षांत खासदार म्हणून कामे करायला हवीत, ती त्यांनी केली नाहीत आणि आता कोणत्या तोंडाने मते मागायला येतात, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, शेकाप पक्ष कधी संपणार नाही. मोठमोठे आमदार, नेते सोडून गेले. मात्र, शेकाप पक्ष आहे तिथे आहे. शेकाप पक्षाची मते आहेत, तीच आहेत. कोणत्याही मतदारसंघातील एकही मत कमी झालेले नाही. जे पक्ष सोडून गेले, ते फसले. त्यांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही, अशी परिस्थिती आहे. शेकाप पक्ष सोडून गेला, तो कधीच मोठा होऊ शकत नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.