पुणे : बहुचर्चित शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीला ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी धक्कादायक वळण लागून पॅनलप्रमुख अभय दाढे यांच्या कार्यालयात तब्बल २५० ते ३०० बोगस मतपत्रिका सापडल्या. याप्रकरणी शि. प्र. मंडळीचे बरखास्त अध्यक्ष दाढे यांना अटक केली असून, त्यांच्या पॅनलमधील अनंत माटे, जयंत शाळिग्राम यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाढे, माटे, शाळिग्राम यांच्यावर बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी, तर सोमनाथ खराटे, प्रमोद मुळीक, प्रकाश जोशी, समीर कारखानीस आदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या शि. प्र. मंडळीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. नव्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी सुमारे ३ हजार ७०० मतदार आहेत. ५०४ मतदार पोस्टाने मतदान करणार होते. मात्र, पोस्टाने आलेल्या काही मतपत्रिका शि. प्र. मंडळीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कपाटात सापडल्याने खळबळ उडाली. बोगस मतपत्रिकांच्या माध्यमातून गैरप्रकार केला जात असल्याची माहिती परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना समजली. त्यांनी पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कार्यालयाची झडती घेण्याची मागणी केली. दाढे यांच्याच टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काही मतपत्रिका सापडल्या. त्यानंतर निवडणूक अधिकारी पद्माकर गायकवाड व बद्रिनाथ मूर्ती यांनी कार्यालयाची झडती घेतली. त्यात काही कर्मचाऱ्यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काही मतपत्रिका सापडल्या. (पान ९ वर)ड्रॉवर फोडून तपासणी; आज मतदान होणारच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचारी, पॅनलचे प्रतिनिधी आणि पोलिसांच्या समक्ष शि. प्र. मंडळीच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या ड्रॉवरची झडती घेतली. त्यामध्ये ७ ते ८ मतपत्रिका आढळल्या. आपल्या टेबलचा ड्रॉवर उघडण्यास दाढे यांनी विरोध दर्शविला. चावी नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ती अगोदरच फेकून देण्यात आली होती. त्यांनी ड्रॉवरला सील लावण्याची मागणी केली. शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी सहधर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ड्रॉवर फोडल्यानंतर त्यामध्ये अनेक मतपत्रिका आढळल्या. या प्रकारानंतरही बुधवारी (दि. ३०) नव्या कार्यकारिणीसाठी मतदान होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शि. प्र. मंडळीच्या अभय दाढे यांना अटक
By admin | Published: March 30, 2016 2:18 AM