ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - "ना आम्ही देहविक्री करतो, ना आम्ही अंमली पदार्थांच्या आहारी गेलो आहोत", असं 23 वर्षीय शिवांगी सुळेने सांगितलं आहे. स्वतंत्र आयुष्य जगता यावं यासाठी शिवांगी सुळेने आपल्या 21 वर्षीय बहिण समीरासोबत मालाडमधील आई वडिलांचं घर सोडलं आहे. आपल्या आई, वडिलांकडून आपल्याला त्रास दिला जात असून, शिफू संस्कृतीची चुकीची बदनामी केली जात असल्याचा दावा या बहिणी करत आहे. आपला निषेध नोंदवण्यासाठी दोघी बहिणींनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत मरिन ड्राईव्हला हातात पोस्टर घेऊन आम्ही पीडित असून आम्हाला न्याय द्या अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार "आम्हाला स्वतंत्र आयुष्य हवं आहे. आमचे पालक आमच्याविरोधात चुकीचे आरोप करत असून आम्ही सेक्स आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याची खोटी माहिती पसरवत आहेत", असा आरोप या बहिणी करत आहेत. आमचे पालक शिफू संस्कृतीबद्दल उच्च न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. "शिफू संस्कृती आपलं शरिर आणि मन नकारात्मकतेपासून दूर कसं ठेवावं एवढंच शिकवते", असा दावा या मुली करत आहेत.
"आमच्या पालकांनी आमच्या मागे गुंड लावले असून पोलिसांच्या माध्यमातून आमचा छळ करत आहेत. आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावून तासनतास बसवलं जातं. आम्ही पीडित असून आम्हाला न्याय द्यावा. आम्ही काहीच चुकीचं केलेलं नाही. आमच्या पालकांपासून आम्हाला वाचवा", अशी विनंती शिवांगी करत आहे.
दरम्यान मुलींच्या आई - वडिलांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली असतानाही पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याने न्यायालयाने पोलिसांना सुनावलं. बुधवारी मुंबई पोलिसांनी न्यायालयात माहिती देत शिफू संस्कृतीचे संस्थापक डॉ सुनील कुलकर्णी यांच्याविरोधात सेक्स आणि ड्र्ग्ज रॅकेट चालवत असल्याच्या आरोपाखील गुन्हा दाखल करत असल्याची माहिती दिली होती. गुरुवारी त्यांना मालाड पोलिसांनी अटक केली.
काय आहे प्रकरण -
गतवर्षी 24 डिसेंबर रोजी या दोघी बहिणींना पालकांनी मारहाण करत एका खोलीत डांबून ठेवलं होतं. डॉ सुनील कुलकर्णी यांनी मुलींच्या मित्रांसोबत पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांची सुटका केली होती. यानंतर मुलींनी मालाड पोलीस ठाण्यात आपल्या पालकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा अर्ज दिला होता. मुलींच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या मुलींना शिफू संस्कृतीने जाळ्यात फासल्याचा आरोप केला. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं असा आदेशच दिला होता.
डॉ सुनील कुलकर्णी म्हणतात मी निर्दोष -
डॉ सुनील कुलकर्णी यांनी आपला बचाव करताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. "मी त्यांच्या तावडीतून मुलींची सुटका केली म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहेत", असा दावा डॉ कुलकर्णी यांनी केला आहे.
शिफू संस्कृती काय आहे?
‘शिफू संस्कृती’ म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडत आहे. शिफू संस्कृती नावाचं संकेतस्थळ उपलब्ध असून याठिकाणी लैंगिक बाबींवर माहिती देण्यात आली आहे. विविध महाविद्यालयांतील तरुणींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांना हेरलं जात आहे. यासाठी ‘शिफू संस्कृती’चे पाईक म्हणविणारे तरुण हेरण्याचं काम करत आहेत. घरच्यांकडून घातल्या जाणाऱ्या बंधनांचा बागुलबुवा करणे वा नैराश्य आलेल्या तरुणींना हेरून त्यांना मानसिक आजाराची औषधे देऊन आपल्याकडे आकर्षून घेण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप केला जात आहे.