नागपूर : सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना विदेशातूनच धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तो धमकीचा फोन कुणी आणि कुठून केला त्याचा शोध लावणे जिकरीचे काम आहे. त्यामुळे या फोनचा संबंध लगेच अंडरवर्ल्डशी जोडणे योग्य होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत.पोलीस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा हा फोन शिंदे यांना शुक्रवारी सायंकाळी आला होता. प्रारंभी ‘एनसी’ची नोंद करणाऱ्या सोनेगाव पोलिसांनी नंतर सदर पोलीस ठाण्यात प्रकरण वर्ग केले. सदर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे संबंधित क्रमांक देऊन फोनधारकाचे नाव आणि पत्ता शोधण्याचे प्रयत्न चालविले. प्रारंभी हा १४ अंकी नंबर ‘नेट सेटर‘ने तयार करून खोडसाळपणा केला असावा, असा पोलिसांचा संशय होता. मात्र, हा क्रमांक विदेशातील असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांना धक्का बसला. त्यांनी वरिष्ठांना ‘फोनच्या विदेशी कनेक्शन’चा अहवाल कळविला आहे. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या सूचनेनुसार या तपासाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. ज्या मोबाईल क्रमांकांवरून शिंदे यांना धमकी देण्यात आली, तो क्रमांक नेमका कुणाच्या नावावर आहे, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. गुप्तचर यंत्रणांचीही या कामी मदत घेतली जात आहे, असे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
शिंदेंना विदेशातूनच धमकी
By admin | Published: December 22, 2014 4:56 AM