शरद गुप्ता -
नवी दिल्ली: शिंदेसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेचे ९० टक्के आमदार आणि अनेक खासदार शिंदे यांच्या गटासाेबत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदेसेनेकडून शिवसेनेच्या चिन्हावर लढविण्याचा दावा करण्यात येणार आहे. त्यामुळेच भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच संपविणे या एकमेव हेतू या निर्णयामागे आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हाेतील, अशी घाेषणा करून सर्वांना माेठा धक्का दिला. मात्र, भाजपच्या या निर्णयामागे बरीच कारणे आहे. सर्वात माेठा हेतू म्हणजे मुंबई महापालिकेची सत्ता मिळविणे हा आहे. तर त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या शासनकाळातील लक्ष्य म्हणजे शिवसेनेच्या अभेद्य संघटनाला सुरूंग लावण्याचा आहे. त्यानंतर त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे वजन उद्धव ठाकरेंपेक्षा माेठे नसेल तर किमान त्यांच्या बराेबरीचे दिसावे, यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत.
शिवसेनेवर सध्या ठाकरे कुटुंबीयांची पकड आहे. त्यामुळे तीन चतुर्थांश आमदार साेबत असूनही एकनाथ शिंदे मुंबई येण्यासाठी तयार नव्हते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे महाराष्ट्रात परतले. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांची सुरक्षा देण्यात आली हाेती. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे विधिमंडळ सदस्य तसेच पक्षसंघटनही उद्धव ठाकरेंना साेडून शिंदेंकडे येईल, अशी भाजपला अपेक्षा आहे.
उद्धव ठाकरेंना शिवसेनेचीही साथ मिळणे कठीण -उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही मागणी शिंदे गटाने खूप आधीपासून केली हाेती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना काॅंग्रेस किंवा शिवसेनेची साथ मिळण्याची शक्यता फार कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घाेषणा केली. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचे प्रखर प्रतीक आता राहिलेले नाहीत. त्याऐवजी भाजप आणि एकनाथ शिंदेंचा गट समाेर आला आहे.