मुंबई - राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात असल्याने महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार बुडतायेत असा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर केला जातो. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी कौशल्य विभागाच्या पुढाकाराने १ लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिंदे -फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखाहून अधिक रोजगारासाठी आज सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोशयारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी असा निर्णय केला, आमच्या सरकारचा सर्वाधिक भर हा रोजगारावर असला पाहिजे. देशात शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूर केली. १० लाख रोजगार देण्याचा निर्णय केला. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने ७५ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय केला. त्याचसोबत खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाचा महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील ४५ टक्के लोक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत आणि शेती क्षेत्राला एवढा रोजगार देण्याची क्षमता नाही. त्यामुळे उत्पादन, सेवा क्षेत्रात जोपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत युवाशक्तीच्या हाताला कुणी काम देऊ शकत नाही. नोकरीची संधी निर्माण करायची असेल तर कौशल्य विकास हे महत्त्वाचं माध्यम आहे. आम्हाला प्रशिक्षित माणसं मिळत नाही असं उद्योजक सांगतात तर तरुण आमच्या हाताला काम नाही ही दरी संपवण्यासाठी कौशल्य विभाग काम करतंय. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन हाताला काम देण्याची जबाबदारी या विभागाने उचलली आहे. शेती क्षेत्राला सेवा, उत्पादन क्षेत्राशी जोडल्यानंतर शेतीवरील २० टक्के भार कमी होतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात करारानुसार १ लाखाहून अधिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आम्ही MOU करून विसरणारे लोक नाही. करार झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू, काही अडचणी सोडवू, सातत्याने सरकार तुमच्या संपर्कात असेल. योग्यप्रकारे सर्वजण काम कराल याचा विश्वास आहे. मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर दरवर्षीपेक्षा ३ पट रोजगार मेळावे घेतले जात आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'या' क्षेत्रात नोकरीची संधीया कार्यक्रमात ४४ नामांकित उद्योजक, प्लेसमेंट एजन्सी, कौशल्य विभागाचे आयुक्त यांच्यासमावेत रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यातील १ लाखाहून अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यात प्रामुख्याने हॉस्पिटॅलिटी, मीडिया अँन्ड एन्टरटेन्मेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन या क्षेत्रात दहावी पास-नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"