मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप पूर्ण झालेला नाही. जून महिन्याच्या अखेरीस शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच दीड महिना कारभार चालवला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात या सरकारचा पहिला विस्तार झाला होता. मात्र त्यामध्ये मोजक्याच आमदारांना स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिंदे सरकारचा दुसरा विस्तार कधी होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुहुर्त मिळाला असून, दसऱ्याच्या मुहुर्तावर सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दसऱ्याच्या मुहुर्तावर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती माहिती दिली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे संकेत सरकारकडून मिळत आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना संधी मिळालेली नाहीत. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
पहिल्या विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, नाराज असल्याच्या चर्चा होत्या अशांना या विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. मिळत असलेल्या संकेतांनुसार दसऱ्याच्या मुहुर्तावर विस्तार केला जाईल. जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र कोर्टकचेरीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये पहिला विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी ९ जणांना संधी मिळाली होती. पहिल्या विस्तारात शिंदे गटातील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे काही नेते नाराज झाले होते. या नेत्यांना आता संधी मिळू शकते.