NCP Ajit Pawar Group News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार करताना पाहायला मिळत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले असले तरी, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही दिल्लीतील नेत्यांचीही इच्छा आहे, असा दावा करण्यात आला आहे.
अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही फक्त अमोल मिटकरी यांची इच्छा नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. दिल्लीतील अनेक नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. माझीही तीच इच्छा आहे, असे शिंदे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
...म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे आहोत
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. पण त्यासाठी १४५ आमदारांचा आकडा लागतो. तो आकडा आम्ही गाठला तर अजितदादा हेच शंभर टक्के मुख्यमंत्री होतील. पण सध्या तरी आमच्याकडे हा आकडा नाही. म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे आहोत. त्यामुळे आमचे सरकार सुरू आहे. माझी इच्छा असण्याचा प्रश्नच नाही. पण दिल्लीतील प्रत्येक नेत्यांना दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वाटत आहे. आता दिल्लीतील कोणकोणते नेते आहेत, हे मला स्पष्ट करण्याची गरज नाही, अशी सूचक प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले हा निव्वळ योगायोग होता. त्यांचा दौरा पूर्वनियोजित होता. पंतप्रधानांना लगेच भेटता येत नाही. कमीत कमी १५ दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तशी त्यांची अपॉइंटमेंट झाली फिक्स झाली असेल, असे सांगताना, राष्ट्रवादीच्या लोकांना जास्त निधी मिळणं हा निव्वळ गैरसमज असेल. अजित पवार यापूर्वीही उपमुख्यमंत्री होते. अजितदादा स्ट्रेट फॉरवर्ड मंत्री आहेत, असे अनिल पाटील म्हणाले.