Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्ररकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. राज्यासह देशभरातून या प्रकरणाविषयी रोष व्यक्त केला. राज्यातही या प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणावरुन आता राजकारण देखील सुरु झालंय. सत्ताधारी आणि विरोधक यावरुन एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने या बलात्कार प्रकरणाविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुनच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवरुन महाविकास आघाडीने महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडीने महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दुसरीकडे देशपातळीवरही या घटनेवरुन निषेध नोंदवण्यात येत आहे. मात्र एका चॅनेलच्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या प्रवक्त्याने वादग्रस्त विधान केलं. यावरुनच आता शिंदे गट आक्रमक झाला असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांनी चर्चा सत्रादरम्यान, बदलापूर प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केलं. जर मराठी माणसाने बदलापूरमध्ये बलात्कार केला तर त्यालाही तुम्ही वाचवणार का? असं वक्तव्य आलोक शर्मा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन चर्चेसाठी आलेल्या भाजपच्या शहजाद पुनावाला यांनी आक्षेप घेत शर्मा यांचा विरोध केला. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी शर्मा यांना धडा शिकवणार असल्याचे म्हटलं आहे.
"मी काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे. त्यांनी मराठी समाजाला बलात्कारी म्हटले आहे. आम्ही त्यांना धडा शिकवू. काँग्रेसने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना गुलाम बनवले आहे. म्हणून ते मराठी समाजाचा अनादर करू शकत नाहीत. आम्ही खरे शिवसैनिक आहोत आणि मराठी माणसाच्या अभिमानासाठी आणि सन्मानासाठी आम्ही काँग्रेससोबत लढू," असे राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही या प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "काँग्रेसच्या प्रवक्त्याने मराठी माणसाच्या विरोधात जे विधान केलं त्याचा मी निषेध करतो. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना विचारु इच्छितो की, तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या सोबत आहात की काँग्रेससोबत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पण मुंबईला इथपर्यंत नेणाऱ्या मराठी माणसाविषयी असे म्हटलं जात असेल तर तुम्ही काँग्रेसचे समर्थन करणार आहात का?," असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं.