“अजितदादांनी आमच्यासोबत यावे, ते कार्यक्षम नेते पण राष्ट्रवादीत...”; दीपक केसरकरांची खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:00 PM2023-06-16T12:00:38+5:302023-06-16T12:04:01+5:30
Deepak Kesarkar Offer To Ajit Pawar: अजित पवारांबद्दल अतिशय आदर आहे. अजितदादांनी सरकारमध्ये यावे, ही आमची अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
Deepak Kesarkar Offer To Ajit Pawar: आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार यांनी आमच्यासोबत यावे, अशी खुली ऑफर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. त्यांनी अशी वक्तव्ये करु नये. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.
राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतेय हे सर्वांना माहिती आहे
अजित पवार यांनी सरकारमध्ये यावे, ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतेय हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत दीपक केसरकर यांनी थेट खुली ऑफर दिली. दुसरीकडे, आपल्याच माणसाला धमकी द्यायला लावतात. ही कशी लोक आहेत, यांचे बुरखे आपोआप फाटले जात आहेत. ते किती घाणेरड बोलतात हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्या पक्षाने नवीन काहीतरी चॅनल सुरु केले आहे. त्यात राऊतांना घेतले नाही. सुषमा अंधारे यांना घेतले आहे. त्या बाळासाहेबांबद्दल काय बोलल्या अन् त्यांना प्रवक्ता केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. त्यांनी ते विचार सोडले, अशा शब्दात केसरकर शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला खोके घेतले म्हणण्याचा? कोर्टाने नोटीस दिली तेथे जाऊन उत्तर द्या. पैशांनी कोणी विकल जात नाही. ते खोट बोलतात, बाळासाहेब नेहमी खर बोलायचे. तरुण असून तुम्ही मंत्रालयात जात नव्हता. पर्यटनमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी कोकणासाठी काय केले? लोकांना भडकावून पोळी भाजून घ्यायची. एकनाथ शिंदे गरजवंताना मदत करणारे आहेत. जे बाळासाहेब करायचे ते शिवसैनिक करत आहेत. पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायला तयार होते अन् तुम्ही खोट बोलत फिरत आहात, या शब्दांत दीपक केसरकर यांनी हल्लाबोल केला.