Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका करत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि भाजप याला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यातच संजय राऊतांनी केलेल्या विधानांमुळे आता संजय राऊत यांची राज्यसभेची खासदारकी आणि जामीन रद्द करण्यासंदर्भात शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत दोन हजार कोटींचा जो आरोप करत आहेत, त्यावर रितसर केस दाखल व्हायला हवी. आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यासंदर्भात निर्णय होईल. पक्षाच्या विरोधात ते काम करत आहेत, पक्षाच्या हिताच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे राज्यसभेचे त्यांचे सदस्यत्व का रद्द करु नये, या संदर्भात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यावर संजय राऊत यांना नोटीस दिली गेली पाहीजे, असे माझे मत मी राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडणार आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत
संजय राऊत यांच्याविरोधात प्रस्ताव आणून बेलगाम वक्तव्य करणाऱ्या लोकांना लगाम बसविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच ईडीने त्यांना जामीन देत असताना काही अटी-शर्ती घातलेल्या आहेत. तरीही ते आपल्या वक्तव्यातून भीती निर्माण करत आहेत. त्यामुळे आम्ही रितसर न्यायालय, ईडी आणि सरकारडे तक्रार करुन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत. अतिशय घाणेरड्या भाषेत ते बोलत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, शिवसेना संपविण्याच्या संदर्भात संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय बोलणे झाले? याबद्दल मला माहिती नाही. परंतु राष्ट्रवादीच्यावतीने त्यांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना संपू शकली नाही. आम्ही उठाव केला, म्हणून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. मात्र आम्ही पहिला आणि दुसरा क्रमांक न पाहता युतीमध्ये एकत्र राहू. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तडजोड करणार नाही, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"