Maharashtra Politics: आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली, तर जनमताचा कौल कुणाच्या बाजूने असेल, याचा एक सर्व्हे घेण्यात आला. सीव्होटरने घेतलेल्या सर्व्हेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा सर्व्हे विश्वासार्ह नसल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. या टीकेला टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना नैतिकतेची थोडी जरी जाणीव असेल तर त्यांनी आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा, असे शिंदे गटाने म्हटले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेले. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला, अशी घणाघाती टीका दीपक केसरकर यांनी केली.
आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा
दीपक केसरकर पुढे म्हणाले की, मूळातच ते आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत. थोडी जरी त्यांना नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा, असे आव्हान दीपक केसरकर यांनी दिले. तसेच पक्षाचे चिन्ह आपल्याच गटाला मिळणार असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे.
आमचाच विजय होईल, निकाल आमच्याच बाजूने लागेल
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती मतदान झाले हे पाहिले जाते. किती सदस्य निवडून आले हे पाहिले जाते. आमच्यासोबत ऐंशी ते नव्वद टक्के आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. आमचाच विजय होईल, असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. त्या ठिकाणी संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. काँग्रेससोबत हातमिळवणी करतात. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे, या शब्दांत केसरकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"