अजितदादा सकाळी दात न घासताच शपथविधीला गेले होते, कारण..; शिंदे गटाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:30 PM2023-02-13T16:30:10+5:302023-02-13T16:30:36+5:30
जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? असा सवाल शिंदे गटाने अजित पवारांना विचारला आहे.
पुणे - अजित पवारांची टीका म्हणजे स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी परिस्थिती अजितदादांची झाली आहे. अजितदादा २३ नोव्हेंबरच्या पहाटेच्या शपथविधीसाठी दात न घासताच गेले होते कारण त्यांना घाई होती असं एका राष्ट्रवादी नेत्यानेच मला सांगितले. त्यांनी जो उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी केला ती गद्दारी होती की शरद पवारांविरोधात उठाव होता असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना विचारला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, ज्यावेळी अजित पवार यांनी शपथविधी केला तेव्हा जे स्वत:ला पवारांचे पुत्र म्हणतात त्यांनी आम्हाला फोन करून अजितदादांचे पुतळे जाळा असा फोन केला होता. राष्ट्रवादीच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनीही पुतळेही जाळले होते. मग अजित पवारांनी जो प्रकार केला होता त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळले का? आपण काय केलंत? पहाटेचा शपथविधी केला त्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी करणं गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत १० जून १९९९ राष्ट्रवादी पक्षाची स्थापना, आम्ही काँग्रेसपासून वेगळे आहोत असं पवारांनी पत्र लिहिलं होते. ती गद्दारी नव्हती का?, जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विचारांवर पक्ष वाढवला. मुळात शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राष्ट्रवादीने केले आहे. ग्रामीण भागात शिवसैनिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढून पक्ष वाढवला. त्या शिवसैनिकांना संपवण्याचं काम राष्ट्रवादीनं केले. त्यामुळे शिवसेना टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड नव्हे तर उठाव केला आहे असंही नरेश म्हस्के म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची सभा, त्यांची कारकिर्द, लोकांचा प्रतिसाद पाहून संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलंय. राऊतांचा भोंगा सकाळी सुरू होतो. संजय राऊतांना कोण विचारतंय? फक्त सकाळी भुंकणे हेच राऊत करतात. त्यांनी लोकांसाठी काय केलंय? असा सवाल नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना केला आहे.