Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. जनतेत उतरुन निवडणूक लढवून दाखवा. तुम्ही ठाण्यात लढणार असाल मी ठाण्यात येतो अन्यथा वरळी मतदारसंघात माझ्याविरुद्ध लढवून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. यानंतर आता शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.
शिंदे गटातील मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर पलटवार करत एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. आम्ही काही क्षणांसाठीच थोडे घराबाहेर पडतो, असा टोला लगावत केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, तर लोकांमध्ये सतत वावरावे लागते, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. तसेच सहा महिन्यांपासून त्यांना तीन शब्दांच्या पलीकडे बोलता येत नाही. सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलले पाहिजे, असे दादा भुसे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्या मनाचा कोतेपणा दिसून येतो
आदित्य ठाकरे यांनी आजोबा चोरल्याचे म्हटले आहे, त्यावर भुसे म्हणाले की, हिंदुहदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मनाचा कोतेपणा येथे दिसून येतो. उद्या हे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनाही चोरले, असे म्हणतील, हा त्यांच्या मनाचा कमीपणा आहे. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, लोकांमध्ये सातत्याने असले पाहिजे, या शब्दांत दादा भुसे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.
दरम्यान, त्यांचे पाय वरळीला लागतायत, याचा आनंद आहे. परत सांगतो, राजीनामा देऊन येण्याची वाट पाहतो. ३२ वर्षाच्या तरुणाला सरकार कसे घाबरते, हे वरळीत महाराष्ट्र पाहिले. आम्ही मोदींची माणसे आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलात वरळीत मोदी सेना येणार आहे, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"