“अजित पवारांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले, विचारधारा बदलली तर…”; शिंदे गटाचे सूचक विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 01:48 PM2023-04-22T13:48:31+5:302023-04-22T13:49:26+5:30
Maharashtra Politics: अजित पवारांच्या इच्छेवर उरलेल्या शिवसेना ठाकरे गटाने, काँग्रेसने बोलले पाहिजे. आवळलेली वज्रमूठ एकत्र नाही हे यावरुन सिद्ध होते, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून, पक्ष सोडण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, खुद्द अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत खुलासा केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातच आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून प्रतिक्रिया येत असून, शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी विचारधारा बदलली तर स्वागत आहे, असेही शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांची विचारधारा जर बदलली, त्यांनी आमची विचारधारा जर स्वीकारली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू. परंतु, प्रश्न विचारधारेचा आहे, सांगत उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आल्यास काहीच अडचण नसल्याचे सूचित केले आहे.
अजित पवार यांनी सातवेळा मोदींचे कौतुक केले
अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर उरलेल्या शिवसेनेने बोलले पाहिजे. काँग्रेसने बोललेले पाहिजे. शिवसेना ठाकरे गट सांगतात की, आमचा मुख्यमंत्री होणार, काँग्रेस सांगते आमचा मुख्यमंत्री होणार, यावरून आवळलेली वज्रमूठ एकत्र नाही हे सिद्ध होते. एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी सात वेळा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे, असेही ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोध पक्षनेते आहेत. त्यामुळे सरकार जाणार हे त्यांना सांगावच लागते. पुढील दीड वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. आगामी काळात शिंदे -फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला, तर कोणतेही नाव समोर येत नाही
अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भाजप २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वदूर पोहोचली. याला एकमेव कारण नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा करिश्मा देशात चालला. त्यांनी देशात तसा विश्वास संपादन करत किंवा आपल्या भाषणातून जनतेला आपलंसं करण्याचं काम मोदींनी केले आहे. १९८४ नंतर पहिल्यांदा देशात २०१४ साली बहुमत असलेले सरकार अस्तित्वात आले. काँग्रेसच्या सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आपला करिश्मा निर्माण केला, हे नाकारता येणार नाही. मात्र, आज नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न विचारला, तर कोणतेही नाव समोर येत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केले, असा खुलासा अजित पवार यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"