Maharashtra Politics: गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गट, भाजपसह शिंदे गटाला कानपिचक्या दिल्या. तत्पूर्वी, राज ठाकरे यांच्या सभेआधी सेना भवन परिसरात, “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”, अशा आशयाचे बॅनर लावले होते. यावरून आता शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी टोला लगावला आहे.
शिवसेनेची गुढी आम्ही पुन्हा उभी करू, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नवीन गुढी उभी करावी लागणार आहे. याचा अर्थ राऊत यांनी शिंदे यांचे नेतृत्व वाढलेले आहे. मोठे झालेले आहे. हे मान्य केले, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
गेल्या ५-६ महिन्यात ८-१० भावी मुख्यमंत्री झालेत
राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यासंदर्भात विचारले असता, भावी मुख्यमंत्री या पाच-सहा महिन्यांत सात-आठ झालेत. भावी होण्याला काही अडचण नाही. अजूनही दहा-बारा भावी मुख्यमंत्री झालेत तरी अडचण नाही. परंतु, उद्या निवडणूक झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होणार, असा मला विश्वास वाटतो, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची रात्री पाहणी केल्याप्रकरणी झालेल्या टीकेवर बोलताना, शेतकऱ्यांचे नुकसान बघत जात असताना दिवस मावळताना एखाद्या ठिकाणी गेले तरी बोलून नुकसान लक्षात घेता येते. ते रात्री ९ वाजता बैठक घेतली तरी अंदाज येतो, गावात काय घडले. टोमणे मारण्याशिवाय राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला काम राहिले नाही. शिंदे-फडणवीस सरकार रात्रंदिवस काम करत आहे. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत, असे शहाजी बापू यांनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"