विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज जोरदार राडा झाला. शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर बसून शिंदे गटाला ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा देत होते. यावर आज शिंदे गटाने मविआच्या घोटाळ्यांवरून आंदोलन केले. यावरून हा वाद उफाळून आला.
यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक, शहाजी बापू पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला.
'५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले
यानंतर मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, असे ते म्हणाले. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो. - अमोल मिटकरी.
भरत गोगावलेंचे प्रत्यूत्तर...महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केले. आम्ही आज केले. आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असते. ते आमच्यावर आंदोलन करून आरोप करत होते. तेव्हा आम्ही बाजुने जात होतो. त्यांना उत्तरही देत नव्हतो. आज आम्ही पहिले तिथे होतो. त्यांचा इतिहास काढत होतो. ते त्यांना झोंबले. आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. काही दिवस ते खोके खोके करत होते, आम्ही आज ओक्के करून टाकले. अरे हट् आम्हाला कोण धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली, असे भरत गोगावले म्हणाले.