Maharashtra Politics:महाविकास आघाडीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येत आहे. या महामोर्चाचा एक टीझरही काढण्यात आला आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि चंद्रकांत पाटील यांची वादग्रस्त विधाने दाखवण्यात आली आहेत. महापुरुषांचा अवमान सहन तरी किती करायचा? अशी विचारणा या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारला करण्यात आली आहे. यातच या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अडीच वर्षात जे मुद्दे पुर्ण झालेले नाहीत तेच मुद्दे या महामोर्चात आहेत. महाविकास आघाडीच्या काळात जर हे मुद्दे पुर्ण झाले असते तर हा महामोर्चा काढण्याची वेळ आली नसती, असा टोला राहुल शेवाळे यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षात या विषयांना न्याय दिला असता तर भाजप-शिंदे गटाची युती झाली नसती, असे नमूद करत, उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जात असल्याची खंत राहुल शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केली.
मविआच्या महामोर्चाला रस्त्यावर उतरुन उत्तर देणार
मविआकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपाही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसंच संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. त्याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही 'मविआ'ला रस्त्यावर उतरुनच उत्तर देऊ. उद्या मुंबई भाजपाकडून ठिकठिकाणी 'माफी मांगो' आंदोलन केले जाईल. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार यात सहभाही होतील, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने महामोर्चासाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विवाहाबद्दल बोलताना दिसत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हणताना दिसत आहेत. याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब फुले यांनी शाळा सुरू केल्या. त्यांना सरकारने अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे चंद्रकांत पाटील म्हणताना दिसत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"