Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. शिवसेनाप्रमुख हे पद फक्त बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसते. त्यांच्या पश्चात ते पद आम्ही गोठवले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण केले. तशी पक्षाच्या घटनेतही नोंद केली गेली. पक्षप्रमुख पदाचे काम मी गेली काही वर्ष पाहत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्ष सदस्यत्वाचे आमचे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे सर्वात आधी १६ जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल द्यावा अशी आमची मागणी आहे. कायदे तज्त्रांच्या मते त्या १६ सदस्यांच्या अपात्रेची शक्यताच जास्त आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. याला शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. तसेच उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.
शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत
२०१३ नंतर शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आला, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेवर आक्षेप घेतला. उद्धव ठाकरेंनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची असल्याचा पलटवार राहुल शेवाळेंनी केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार ठाकरेंची नेमणूक झाली तर त्याची माहिती द्यावी. शिवसेनेतील इतर पदे कशी भरली याचीही माहिती द्यावी. विभाग, गटप्रमुख ही पदे भरताना कुठे जाहिराती दिली, किती अर्ज आले हेही दाखवावे, असे आव्हान राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंना दिले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेची सहानभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला लगावताना, २०१३ आणि २०१८ नंतर शिवसेनाप्रमुख पद तसेच ठेवत शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण केले. अनिल देसाई यांनी जी प्रक्रिया सांगितली त्याप्रमाणे निवडणूक होते, अर्ज मागविले जातात. २०१३ आणि २०१८ मध्ये कुणी अर्ज केला, पक्षप्रमुख पदासाठी तेव्हा आमचा उद्धव ठाकरेंना सर्वांचा पाठिंबा होता. मात्र नेते, उपनेते, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखासाठी मतदान झाले का? अशी विचारणा राहुल शेवाळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"