Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतर शिवसेनेकडून सातत्याने राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचा दावा केला जात आहे. याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा समचार घेताना, शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचे खेळणे हाती दिले जात आहे, अशी टीका केली आहे.
राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांना एका बैठकीदरम्यान दिले. यानंतर राज्यातील मध्यावधी निवडणुकांवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचे एक स्टेबल सरकार राज्यात आलेले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार अशी वक्तव्ये प्लॅनिंग करून केली जातात, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही अनेक आमदार
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, आमच्या संपर्कात अनेक आमदार आहेत. आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही अनेक आमदार आहेत. जे काही शिल्लक आमदार आहेत, ते कुठेही जाऊ नयेत. म्हणून मध्यावधी निवडणुकांचे एक खेळणे त्यांच्या हाती दिले जात आहे. जनतेसाठी काम करणारे सरकार आले आहे. त्यामुळे पुढील निवडणूक जेव्हा लागेल, तेव्हा यांची काय परिस्थिती होईल, या विचारानेच यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, अशी घणाघाती टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
दरम्यान, मध्यावधी निवडणुकांच्या विधानावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काही जणांना पोटशूळ उठलेले आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढे काम करत आहे, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहिले तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाही. मध्यावधी निवडणुका लागतील असे बोलत आहेत. तुमचे लॉजिक काय, अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"