Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरे गटाला आताचे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का? अशी विचारणा शिंदे गटाने केली आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गट, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर कुत्र्याचे उदाहरण देत संजय राऊतांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. यावर बोलताना, आतापर्यंतचे कार्यकर्ते काम करत होते ते कुत्रे होते का असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का, संजय राऊत शिवसैनिकांना कुत्रा बोलत आहेत. खासदार संजय राऊत यांच्या वाक्यातून उद्धव ठाकरे कशाप्रकारे सूचनांवर चालत होते हे सत्य महाराष्ट्राला कळले आहे, असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का?
उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का? पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे आल्याने आता ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकली आहे. त्याचमुळे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसमोर केवळ भावनात्मक वातावरण तयार करत आहेत, अशी खोचक टीका म्हस्के यांनी केली. निशाणी हा चोरायचा विषय नसतो कारण शिंदे गटाकडे आता सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे आमच्या बाजूने आहेत. शिंदे गटाला पक्ष आणि चिन्हे मिळाल्याची महत्वाची कारणं आहेत. कारण ज्या दिवसांपासून महाविकास आघाडचे सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हापासून ठाकरे गटाने शिवसेनेला राष्ट्रवादीच्या ताटाखालचं मांजर बनवले होते असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. आतापर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरून तुम्ही बुरखा घालून राष्ट्रवादीच्या मागे पुढे फिरत होता, या शब्दांत म्हस्के यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, दसरा मेळाव्यावेळी त्यांच्या बाजूने निर्णया लागला तेव्हा यांचा न्यायदेवतेवर विश्वास होता. परंतु आता न्यायदेवतेच्या विरोधात हे बोलत आहेत. खासदार संजय राऊत हे आमच्या आमदार आणि खासदारांच्या मतांवरून तुम्ही खासदार बनलेले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही आम्हीच वाढवली, असे नरेश म्हस्के म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"