Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात येत आहे. यातच आता शिंदे गटातील एका आमदारांना यांची डील झाली नाही म्हणून महाराष्ट्रातून प्रकल्प गेला, असा आरोप करताना आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत. ते सर्वांसमोर मांडू, असा इशाराही दिला आहे.
शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी देखील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला. सदर प्रकल्प खराब पाय असणाऱ्या मागच्या सरकारमुळे गुजारातमध्ये गेला. आमचे सरकार येऊन फक्त दोनच महिने झालेत. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई जबाबदार आहेत, असा आरोप शिरसाट यांनी यावेळी केला.
हा प्रकल्प आधीच्या सरकारच्या डिलिंगमुळे बाहेर गेला
हा प्रकल्प आधीच्या सरकारच्या डिलिंगमुळे बाहेर गेला, असा दावा करत शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकल्प आला कधी? एखादी कंपनी स्थापन करायची असेल, तर कंपनीचा मालक वर्षभरापासून नियोजन करत असतो. तो यांना भेटला असेलच. शिंदे गट-भाजपचे सरकार येऊन दोन महिने झाले. दोन महिन्यांपूर्वी कंपनीकडून सर्व प्रक्रिया केली असेल. पण मला मिळालेल्या माहितीनुसार टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला आहे. आधीच्या राज्यकर्त्यांची डील झाली नाही. यांची डील झाली नाही, म्हणून हा प्रकल्प इथून गेला आहे, असा मोठा दावा शिरसाट यांनी केला.
आमच्या हाती लागलेले पुरावे सादर करू
हा प्रकल्प जाऊच नये, अशाच मताचे आम्ही होतो. हा प्रकल्प दोन महिन्यांच्या कालावधीत गेलेला नाही. यांनी त्यांच्या फायद्याचं गणित बघितले. कंपनीवाला तुमच्यासाठी कंपनी टाकत नाही. तो त्याच्या फायद्यासाठी कंपनी टाकत असतो. पण प्रत्येक गोष्टीत डीलिग झाल्याचे समोर येतेय. आता ते ज्या बोंबा मारतायत, त्यावर आम्ही पुरावे समोर मांडू. आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
दरम्यान, नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना, मी स्पष्टपणे सांगतो की माझ्या नाराजीच्या बातम्या दरवेळी येतात आणि मला त्याचा त्रास होतो. दरवेळी मला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागते. मी एकनाथ शिंदेंना याबाबत भेटलो. या अफवा थांबवा, नाहीतर मला मानहानीचा दावा दाखल कारवा लागेल, असा इशारा देत, मंत्रीपद, उपनेतेपद या अपेक्षेने गेलो नाही, तर एका वेगळ्या ध्येयाने गेलो आहे. आजही एकनाथ शिंदेंसोबत आहे, उद्याही आहे आणि परवाही राहणार आहे, असे शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.