Maharashtra Politics: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताराधीर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. या प्रकरणी शिंदे गटातील आमदाराने उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केला आहे.
नारायण राणेंसारखा डरपोक आणि पळपुटे आम्ही नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. कोणाला हिंमतीच्या आणि धाडसाच्या गोष्टी बोलता. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या जर देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. यावर, नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आता या वादावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना आज संपतेय
जेव्हा शिदेंचा उठाव झाला, तेव्हा गुवाहाटीहून मी प्रतिक्रिया दिली होती की, उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना आज संपतेये. तेच प्रकार आज चालू आहेत. काय चालू आहे, कोण बोलतेय, कुणाबद्दल बोलतेय. पक्षाचे कुणाला देणे-घेणे आहे की नाही. स्वत:ची टिमकी वाजवण्यासाठी पक्षाचा वापर आजही चालू आहे. हे लोक कोण आहेत. ग्राऊंड लेव्हलला यांनी काम केलेय का? ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात हे यांना माहिती आहे का? अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली.
तरीही उद्धव ठाकरे गप्प का आहेत?
यांच्या भूमिकेबाबत त्यांच्या पक्षातल्या उरल्या-सुरल्या आमदारांना विचारा तर खरे की ग्राऊंड लेव्हलला आपली काय परिस्थिती आहे. पण आपण कसे लाईमलाईटमध्ये येऊ, या पद्धतीने सगळे चालले आहे. हे पक्षासाठी घातक आहे. पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. तरी उद्धव ठाकरे का गप्प आहेत, हे मला माहिती नाही, असे सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलेने मारले नाही, तर मला विचारा, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"