Maharashtra Politics: आताच्या घडीला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही कायदेतज्ज्ञ १६ आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा करत आहेत. तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करत आहेत. अवघ्या काहीच दिवसांत सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. मात्र, यातच शिंदे गटाकडून या प्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपले ज्ञान पाजळावे. सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचे केलेले नाही. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
सर्वांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत
विरोधक, कायदे तज्ज्ञ जे बोलत आहेत त्यांना माझा सल्ला आहे थोडं थांबा. मग बोला. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना आपल्या पक्षासाठी बोलावे लागते. पण आधी निकाल येऊ द्या, मग बोला. सर्वांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण हे सगळे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केले जाईल अशी खरी प्रक्रिया आहे. त्यामुळे यांयदर्भातला निकाल हे अध्यक्षच लावतील, असे मत शिरसाट यांनी मांडले आहे.
दरम्यान, अजित पवार यांना आता दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे आते ते टीका करतात, असे मोठे विधान करतानाच मुख्यमंत्री शेतात जाऊ शकत नाही का? मुख्यमंत्री काम करतात त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नये, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.