“अजित पवार गट घेऊन आले तर स्वागत करु, NCPसह आल्यास शिवसेना सत्तेत राहणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 01:18 PM2023-04-18T13:18:56+5:302023-04-18T13:21:15+5:30
Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना काही कामांसाठी उद्धव ठाकरे यांची भेट अजित पवार यांनी अनेकदा मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. आजही महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांचे स्थान शोधावे लागते. अजित पवार स्वतःचा गट घेऊन आमच्यासोबत सत्तेत आले तर त्यांचे स्वागतच करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पाठिंबा देत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचाच भाग होतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे आम्हाला मान्य नव्हते. म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. मात्र, अजित पवारांच्या नाराजीवर चर्चा सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही शिवसेना सत्तेत राहणार नाही. मात्र, स्वतः गट घेऊन अजित पवार भाजप किंवा शिवसेनेत येणार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.
नागपूरच्या सभेत अजित पवारांना बोलू दिले गेले नाही
नागपूरला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. त्यात अजित पवार यांना बोलू दिले नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, १६ आमदार अपात्र होतील आणि सत्ता जाईल, या गोष्टींना काही अर्थ नाही, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. पूर्वी सत्ता होती म्हणून हे सगळे जण एकत्र असल्याचे दाखवत होते. मात्र, आता या सगळ्यांचे वेगवेगळ्या दिशेला मार्गक्रमण सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचा आपापसात बेबनाव आहे. अजित पवार अद्यापपर्यंत त्यावर बोललेले नाहीत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर आणि तरच आम्ही त्यांचे निश्चित स्वागत करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल, असा जो काही लोकांचा कयास आहे. तसे झाले तर आम्ही सत्तेत राहणार नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
केवळ अजित पवार नाही, तर काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू
राष्ट्रवादी सोडून अजित पवार भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे. अजितदादा नॉट रिचेबल होणे नवीन नाही. सगळा फोकस अजित पवारांवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील केस आणि अजित पवारांची नाराजी, यामध्ये काहीही संबंध नाही, असे सांगताना केवळ अजित पवार नाही, तर काँग्रेसमध्येही चलबिचल सुरू आहे. त्यांच्या आकड्यांचीही बेरीज जुळूत नाही. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना आता आघाडीत राहू नये, असे वाटत असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"