Maharashtra Politics: आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली, तर जनमताचा कौल कुणाच्या बाजूने असेल, याचा एक सर्व्हे घेण्यात आला. सीव्होटरने घेतलेल्या सर्व्हेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजप-शिंदे गटाने हा सर्व्हे फेटाळून लावला असून, महाविकास आघाडीचे नेते यावरून भाजप-शिंदे गटावर टीका करत आहेत. यातच आता सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. मात्र भविष्यामध्ये निश्चितच पंतप्रधानपदाला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असे मोठे विधान शिंदे गटातील आमदाराने केले आहे.
मीडियाशी बोलताना, भाजप विरोधात जनमत आहे हे शरद पवार साहेबांचे मत व्यक्तिश: आपणास मान्य नाही. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराबाबत जनता समाधानी आणि सुखी आहे, असे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाला वंचित आणि शिवसेनेच्या युतीचा कुठेही फटका बसणार नाही, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
भविष्यात पंतप्रधानपदाला न्याय देण्यास गडकरी सक्षम
सध्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. परंतु, पुढे भविष्यात निश्चितच पंतप्रधानपदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता आणि शक्ती नितीन गडकरी यांच्यामध्येच आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले. लोकसभेत शिंदे आणि फडणवीस यांच्या उमेदवारांना चांगले बहुमत मिळेल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. तसेच राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे हे राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अचानकपणे सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना तत्त्व सोडून अनेकांशी युती करावी लागते आहे. आगामी निवडणुका कशा लढवाव्यात यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ही त्यांची केविलवाणी धडपड आहे. वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"