Maharashtra Politics:शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगावर टीका होत असताना, भाजप आणि शिंदे गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, संजय राऊतांची मानसिकता बिघडली आहे. त्यांच्या विधानाला राज्यातील जनता भीक घालणार नाही, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी २ हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी ५० लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा न्याय नाही. हे डील आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावर, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगामुळे लोकशाही टिकून आहे
संजय राऊत खासदार आहेत. त्यांच्या सारख्या व्यक्तीने २ हजार कोटींचे डील झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. या देशात केंद्रीय निवडणूक आयोगामुळे लोकशाही टिकून आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थांवर टीका करुन संजय राऊत जनसामान्यात लोकशाही विषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांच्या विधानाला राज्यातील जनता भीक घालणार नाही
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मजबूत पुराव्यामुळे लागला आहे. संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे. संजय राऊत लोकशाही आणि समाजाची मानसिकता बिघडवण्याचे महापाप करत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. संजय राऊत नागापेक्षाही विषारी फुत्कार त्यांच्या तोंडातून टाकत आहे. महाराष्ट्र सुजाण आहे. राज्यातील जनता संजय राऊत यांच्यांसारख्यांच्या विधानांवर कुठलीही भीक घालत नाही, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"