Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यातच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादही पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी सूचना केल्या आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. याला शिंदे गटातील मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप व शिवसेनेचे जे सरकार महाराष्ट्रात आहे. हे सरकार महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेणे, महाराष्ट्राकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जातोय. त्यामुळे कोणात धमक आहे आणि कोणामध्ये धमक नाही हे नुसते बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझे एवढेच सांगणे आहे की, तुमच्या काळात २०२० पासून सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या सवलती, त्यांना राज्याकडून केली जाणारी मदत थांबली होती, ती शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तत्काळ सुरू झालेली आहे. तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो, या शब्दांत देसाई यांनी पलटवार केला आहे.
संजय राऊतांनी आमच्याबाबत बोलू नये
आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, तिने पाच महिन्यांपूर्वीच त्यांना दाखवलेले आहे. आमची हिंमत काय आहे?, आमच्यात काय धमक आहे?, याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्याबाबत त्यांनी ते बोलू नये, असा इशाराही देसाई यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात कबड्डीचा खेळ असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे. या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. हतबल, लाचार लोकं असून, काही करू शकत नाहीत. फक्त बोलतात आणि आम्हाला शिव्या घालतात. त्या बोम्मईंना शिव्या घालून त्यांच्या नावाने बोंबला. शिवरायांचा इतिहास आणि बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात, घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला संरक्षण असून, जायला हवे. मात्र, मुळमुळीत धोरण असलेले हे सरकार आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"