आमदार अपात्रता प्रकरण निकालावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट नाराज असल्याचे वृत्त आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात, तर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका करण्यात आली आहे. यातच या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज खुली पत्रकार परिषद घेणार आहेत. यात कायदेतज्ज्ञांसह अन्य मान्यवर तसेच जनता उपस्थित असेल, असे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमची बाजू संविधानाची आहे, लोकशाहीची आहे आणि सत्याची आहे. त्यामुळे कोंबडं झाकण्याचा कितीही प्रयत्न केलात, तरी सूर्य उगवायचा राहणार नाही, असं ठाकरे गटाकडून म्हटलं जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या आजच्या पत्रकार परिषदेवरुन शिंदे गटाने निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. आम्ही संपलेलो नाही. आमचे थोडे तरी अस्तित्व आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्यावेळेस पत्रकारांशी बोलायला पाहिजे होते, तेव्हा मी आणि माझे कुटूंब आणि लॅपटॅाप यातून ते बाहेर नाही आले, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. नियमानुसार आम्ही उच्च न्यायालयात जावून उबाठा गटातील १४ आमदारांना अपात्र करावे अशी मागणी केली आहे. अध्यक्षांवर दबाव होता म्हणून त्यांनी हा निकाल दिला असा आमचा आरोप आहे. अध्यक्षांना कोणी तरी भीती दाखवली म्हणुन त्यांनी तो निर्णय दिला नाही, असं नरेस म्हस्के यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमके झालेय? हे ते सांगणार आहे. महापत्रकार परिषदेत दिल्लीतील दिग्गज वकीलही असणार आहेत. देशातील कोणत्याही पत्रकाराने यावे आणि प्रश्न विचारा. सगळ्यांची उत्तर दिली जातील. राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरे दिले नाहीत, मात्र आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.