Andheri Bypolls: मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ताकदीने कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने यातून माघार घेत भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा दर्शवला आहे. यातच राज्याचे मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचा उमेदवार अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उदय सामंत यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. आमचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घोषणा करतीलच
आम्ही कशापद्धतीने तयारी केली, उमेदवार निवडूण आणण्यासठी कशापद्धतीने जोर लावला जाईल हे समोरच्याला कळेलच. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार आम्ही उभा करणार आहोत. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घोषणा करतीलच, आमचा उमेदवार विजयी होईल, असे उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, कोकणात कितीही गट झाले तरी कोकण पूर्वीपासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तो आजही आहे आणि भविष्यात देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार असे सामंत यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"